CAA -NRC हा भारताचा अंतर्गत मुद्दा, बांग्लादेशच्या पंतप्रधानांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरी रजिस्टर (NRC) भारतातील अंतर्गत बाब असल्याचे म्हंटले आहे. एका मुलाखतीत शेख हसीना सीएएवर म्हणाल्या की, ‘(भारत सरकारने) हे का केले हे आम्हाला समजत नाही. ते आवश्यक नव्हते.’ दरम्यान, शेख हसीना यांचे हे विधान, बांग्लादेशचे परराष्ट्रमंत्री ए. अब्दुल मोमेन यांच्या विधानानंतर आले. मोमेने म्हटले होते की, सीएए आणि एनआरसी ही भारताची अंतर्गत समस्या आहेत, परंतु देशातील कोणतीही अनिश्चितता त्याच्या शेजारील देशांवर होण्याची शक्यता आहे, अशी चिंता व्यक्त केली होती.

यापूर्वी पाकिस्तानचे अध्यक्ष डॉ. आरिफ अल्वी म्हणाले होते की, नुकत्याच झालेल्या नागरिकत्व अधिनियम, १९५५ मध्ये भारतातील सुधारणांतर्गत मुस्लिमांवरील भेदभावाबद्दलही बांग्लादेश चिंतेत आहे. अल्वी म्हणाले, “मी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्याशी बोललो आहे. त्या बिहारमधील मुस्लिमांबद्दल आणि त्यांच्या देशात येणाऱ्या स्थलांतरितांच्या भीतीविषयी चिंतित आहेत.”

गेल्या डिसेंबरमध्येही बांग्लादेशाकडून सीएएवर निवेदन आले होते. बॉर्डर गार्ड्स बांग्लादेशचे (बीजीबी) महासंचालक (डीजी) मेजर जनरल शफिनुल इस्लाम यांनी त्याला भारताची अंतर्गत बाब म्हटले आहे. ते म्हणाले की, एनआरसी ही भारत सरकारची अंतर्गत बाब आहे. तसेच कुटुंब आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या कारणांमुळे लोक सीमा ओलांडतात. आम्ही भारतातून कोणताही बांग्लादेशी परत मिळविला नाही. ते म्हणाले की, ज्या बांग्लादेशी नागरिकांनी भारतात येऊन परत बांग्लादेशात परत आले ते सर्व स्वबळावर परत आले आहेत. कागदपत्रांशिवाय सुमारे ३०० लोकांना पकडले गेले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –