ब्रेकिंग : ७१ कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी करुन त्या नोंदी खºया असल्याचे भासवून ७१ कोटी ७८ लाख ८७ हजार ७२३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने आमदार अनिल भोसले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ, अधिकारी शैलेश भोसले, सूर्याजी जाधव यांना रात्री उशिरा अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विशेष लेखा परिक्षक योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेऊन तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या शिवाजीनगर येथील मुख्य शाखेत खातेधारकांनी जमा केलेल्या ठेवींच्या रक्कमेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाला असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत होत होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानुसार बँकेचे २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे शिल्लक रकमेचे ऑडिट करण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्देश दिले होते. लेखापरिक्षक योगेश लकडे यांनी बँकेतील शिल्लक रोख रकमेची पडताळणी केली असता त्यामध्ये ७१ कोटी ७८ लाख ८७ हजार ७२३ रुपये एवढी रक्कम कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. आरोपींनी आपापसात संगनमत करून बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी करून त्या नोंदी खºया आहेत असे भासवून या रक्कमेचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करीत अपहार केला आणि बँकेच्या खातेदारांची फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आले होते.

बँकेवर सध्या रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले आहेत.
अनिल भोसले हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरी मागील महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. मात्र, निवडणुकीत त्यांना पक्षाचे चिन्ह नाकारल्यावर त्या भाजपाच्या पाठिंब्यावर नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. तेव्हापासून अनिल भोसले हे केवळ नावाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांच्या आमदारकीची मुदत डिसेंबर २०२२ पर्यंत आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होत नाही आणि पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांना भाजपाच्या कोणत्याही व्यासपीठावर सहभागी होता येत नाही.