Loan Apps : लोन अ‍ॅप्सच्या फसवणूकीपासून व्हा सावध ! SBI नं ग्राहकांना ट्विट करुन दिला इशारा, सांगितल्या ‘या’ सेफ्टी टिप्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही काळापासून देशातील बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये लोन अ‍ॅप (Loan App) च्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे. सध्या प्रत्येकाला कर्जाची गरज भासत आहे. याचा फायदा घेत बर्‍याच कंपन्या घरात बसून अ‍ॅपद्वारे लोकांना कर्ज देत आहेत. या लोन अ‍ॅप्सद्वारे आपल्या बँक खात्यात सहजतेने निधी हस्तांतरित केला जातो. त्याचवेळी, काही फसवे लोक या नवीन सिस्टमद्वारे लोकांची फसवणूक करीत आहेत. भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांना अशा फसवणुकीपासून सावध राहाण्यास सांगितले आहे.

एसबीआयने तातडीने आणि अगदी सोप्या प्रक्रियेच्या आश्वासनासह कर्ज देणाऱ्या अनधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मोबाइल अ‍ॅप्सविरूद्ध ग्राहकांना सतर्क केले आहे. बँकेने ट्विट करत म्हटले की, ‘बनावट इन्स्टंट लोन अ‍ॅप्सपासून सावध रहा! कृपया अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका किंवा एसबीआय किंवा इतर कोणत्याही बँकेच्या बनावट घटकास आपला तपशील प्रदान करू नका. आपल्या सर्व आर्थिक गरजांसाठी https://bank.sbi वर भेट द्या.’ यासह एसबीआयने ग्राहकांना काही सेफ्टी टिप्सही दिल्या आहेत. त्याबाबत जाणून घेऊया.

1. ऑफरच्या अटी व शर्ती वाचा.
2. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
3. डाऊनलोड करण्यापूर्वी अ‍ॅपची सत्यता तपासा.
4. तुमच्या सर्व आर्थिक गरजांसाठी https://bank.sbi वर भेट द्या.

अ‍ॅपमधून कर्ज घेणे धोकादायक आहे
कोरोनाच्या सध्याच्या युगात लवकरात लवकर कर्ज घेण्याच्या नादात लोक अशाप्रकारच्या फसवेगिरीला बळी पडतात आणि कर्जासाठी अर्ज करतात. या प्रकारच्या अ‍ॅपच्या माध्यमातून बर्‍याच कंपन्या आकर्षक व्याज दरावर अतिशय कमी वेळात कर्ज देण्याचे आश्वासन देतात. नंतर, थकित रक्कम वसूल करण्यास सक्ती करतात व नंतर इच्छित व्याज जोडतात. यानंतर लोन कंपन्या ग्राहकांना त्रास देऊन लवकरात लवकर पैसे वसूल करण्याची मागणी करतात.

या गोष्टीही लक्षात ठेवा
1. मोबाईल अ‍ॅप्सद्वारे कर्ज घेणे टाळा, कारण आपल्या कागदपत्रांसोबत फसवेगिरी होऊ शकते.
2. कर्ज घेण्यापूर्वी कंपन्यांचे पुढील-मागील रेकॉर्ड तपासा. अशा कंपन्या ग्राहकांकडून अधिक व्याज घेतात, तसेच यामध्ये बरेच असे छुपे शुल्क देखील असतात जे ग्राहकांना सुरुवातीला माहिती नसतात.
3. ग्राहकांनी त्यांच्या केवायसी दस्तऐवजाची प्रत कधीही अज्ञात व्यक्तीकडे किंवा लोन अ‍ॅपवर अपलोड करू नये. लोन घेणार्‍या कंपनीकडून प्रक्रिया शुल्क आणि इतर खर्चाबद्दल देखील जाणून घ्यावे.
4. लोन कंपन्यांकडून देण्यात येत असलेल्या ऑफर्सची संपूर्ण माहिती गोळा करा.
5. आरबीआयच्या वेबसाइटवर जाऊन लोन कंपनीबद्दल माहिती मिळवा.