Coronavirus : बारामतीत सापडला 7 वा ‘कोरोना’बाधित, 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला लागण

पुणे :पोलीसनामा ऑनलाइन – बारामती शहरात एका ७५ वर्षाचा ज्येष्ठ नागरिक कोरोना बाधित झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामतीतील कोरोना संसर्ग झालेला हा सातवा रुग्ण आहे. शहरात म्हाडा वसाहत परिसरात हा रुग्ण राहतो. हा रुग्ण घरातच असल्याने त्याला कोरोना संसर्ग कोणाकडून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची आता तपासणी होणार असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या रुग्णाचा मुलगा औषध विक्रेत्याकडे कामाला आहे.

गेल्या आठवड्यात समर्थनगर येथील भाजी विक्रेत्यासह त्याच्या कुटुंबातील सून आणि मुले तसेच दोन नातवंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यामध्ये या भाजी विक्रेत्याचा ९ एप्रिल रोजी मृत्यु झाला होता. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे बारामतीकरांना दिलासा मिळाला होता.

त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामती भीलवाडा पॅटर्न राबविण्यास सुरुवात केली आहे. असे असताना मंगळवारी शहरात पुन्हा कोरोना बाधित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. बारामतीत सापडलेला हा सातवा रुग्ण आहे. ७५ वर्षाच्या या ज्येष्ठ नागरिकास बाधा कधी झाली, याचा शोध घेतला जात आहे.