MP : न्हावी दादानं एकच ‘वस्तरा’ अन् ‘टॉवेल’ वापरून केली 6 जणांची ‘हजामत’, सगळयांनाच झाली ‘कोरोना’ची लागण

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील गाव बडगावमध्ये सहा जणांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. नायब तहसीलदार मुकेश निगम म्हणाले की, नुकताच एक तरुण इंदूरहून गावी आला होता. ज्याने येथे दाढी केली. या युवकाचे नमुने अगोदरच तपासणीसाठी घेण्यात आले होते आणि नंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

त्या तरूणावर उपचार करण्यात आले व तो बरा होऊन घरी गेला. तसेच ज्या लोकांनी न्हाव्याकडून दाढी करून घेतली, जे त्याच्या संपर्कात आले त्यांच्यापैकी २६ जणांचे नमुने ५ एप्रिल रोजी चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. बाकीच्या नऊ जणांपैकी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

माहितीनुसार, या सगळ्यांची दाढी, कटिंग एकाच कपड्याने केली होती. बीएमओ डॉक्टर दीपक वर्मा यांचे म्हणणे आहे की अद्याप तीन लोकांचे अहवाल आलेले नाहीत. पॉझिटिव्ह रूग्णांना रात्रीच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.

डॉक्टर वर्मा म्हणाले की, गावात सर्वेक्षणासाठी एक पथक पाठवण्यात आले आहे. रुग्णांच्या ३४ कुटूंबाना होम क्वारंटाइन करण्यात आले असून पंचायत गावला सॅनिटाइज करत आहे. तसेच गाव सील केले असून परिसरात पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.

नायब तहसीलदार म्हणाले की, गोगावात ज्या कुटुंबातील ७० वर्षीय महिलेचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेला आता त्याच कुटुंबातील तीन वर्षाची मुलगी व्हायरसने ग्रस्त आहे. तिला होम क्वारंटाइन करून तिच्यावर उपचार केले जात आहेत. तर कुटुंबातील इतर सदस्यांचा चाचणी अहवाल येणे अद्याप बाकी आहे.