UPSC पूर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘बार्टी’तर्फे 50 हजाराचे अर्थसहाय्य !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (BARTI) एकरकमी 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

बार्टीमार्फत ( Babasaheb Ambedkar Research & Training Institute) राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी व प्रशिक्षणाकरीता मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य दिले जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा दि. 4 ऑक्टोंबर रोजी झाली. या परीक्षेचा निकाल 23 ऑक्टोंबरला लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे. बार्टीमार्फत मुख्य परीक्षेसाठी देण्यात येणा-या आर्थिक सहाय्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी बार्टीच्या संकेतस्थळावर पात्रतेचे स्वरुप तपासून घ्यावे, तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून बार्टीच्या अर्जातील ई-मेलवर दि. 8 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज पाठवावेत,असे आवाहन BARTI चे संचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.