पुण्यात कोरोनाचा कहर ! बेडची कमतरता भासत असल्याने भाड्याने घेतली हॉटेल्स

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने बेड्सची संख्या अपुरी पडत आहे. पुण्यातील रुबी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बेडची कमतरता भासत आहे. रुग्णालयाने 3 हॉटेल भाड्याने घेतली असून त्याठिकाणी 180 बेडची व्यवस्था केली आहे. रुग्णसंख्या वाढीचा आलेख असाच राहिला तर पुण्यातील सरकारी रुग्णालय आणि अन्य रुग्णालयातील बेडही लवकरच भरतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पुणे जिल्ह्यात मंगळवारी (दि. 6) 10 हजार 226 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांच्या एकूण संख्येने 81 हजारांचा टप्पा पार केला आहे. काल जिल्ह्यात 28 हजारांपेक्षा अधिक चाचण्या झाल्या आहेत. पुण्यात काल 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान मुंबईतही झपाट्याने कोरोना संसर्ग वाढत आहे. मुंबईत दररोज 10 हजारांवर रुग्णसंख्या वाढत आहे. अशातच नागरिकांना बेडच्या उपलब्धतेमुळे चिंता लागली आहे. बीएमसीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सध्या मुंबईत बेडची कमतरता नसली तरी वाढणारी रुग्णसंख्या पाहता चिंता व्यक्त केली जात आहे.