शोभेच्या दारूचा भीषण स्फोट; तीन जण मृत्यूमुखी

बीड : पोलीसनामा ऑनलाईन
बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील शेकापुर रस्त्याजवळ काही शोभेची दारू विक्री करणाऱ्यांची घरे आहेत. त्या घरातील फटाक्यांना आज (शुक्रवारी) दुपारी साडेचारच्या दरम्यान आग लागली. या आगीचे आवाज वेगवेगळ्या भागातून येत आहेत. त्यामुळे सर्व भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घरांमध्ये स्फोटक दारू असल्यामुळे किती साठा आहे, यांचा अंदाज नाही. या आगीमागेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. यामध्ये सरफराज अल्लाऊद्दीन सय्यद (वय ३८), हर्जना बेगम सय्यद अल्लाऊद्दीन (वय ६०) व फैजान (वय :१५) हे आगीच्या भक्षस्थानी पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत झालेले तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घरात आणखी दोघे अडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. जखमींची संख्याही मोठी असून स्फोटाच्या तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सदरील घटनेने खळबळ उडाली असून मदतकार्य मोठ्या वेगात सुरू आहे. रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे.