बीड : तरुणाने प्रियेसीला पेट्रोल टाकून पेटवले, उपचारादरम्यान मृत्यू

बीड: पोलीसनामा ऑनलाईन – एका तरुणाने आपल्या प्रियेसीवर अ‍ॅसिड फेकले त्यानंतर पेट्रोल ओतून पेटवून देऊन पोबारा केला. यात तरुणी मोठ्या प्रमाणात भाजल्याने उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा केज रस्त्यावर येलंबघाट येथे ही घटना घडली. या प्रकरणी हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश राजुरे (वय 22, रा. शेळगाव, ता. देगलूर, जि. नांदेड) असे या हल्लेखोराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश राजूरे याचे गावातील एका 22 वर्षीय तरुणी सोबत प्रेमसंबंध जुळले होते. ते दोघेही पुण्यात एकत्र राहत होते. दिवाळी निमित्त शनिवारी हे दोघेही दुचाकीवरून पुण्याहून गावाकडे निघाले होते. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास बीड जिल्ह्यातील येलंबघाट जवळ अविनाशने दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर प्रेयसीला रस्त्यापासून दूर एका खड्यात नेऊन तिच्यावर अ‍ॅसिड टाकले. त्यानंतर पेट्रोल ओतून तिला पेटवून देऊन तो तिथून पसार झाला. तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, पहाटेची वेळ असल्याने कुणीही मदतीला आले नाही. मोठ्या प्रमाणावर भाजलेली ही तरुणी तब्बल 12 तास रस्त्यालगत पडून होती. दुपारी तीनच्या सुमारास एका वाहनधारकाला तिचा आवाज ऐकू आला. त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर जखमी तरुणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.