कृषी कन्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शेतमालाच्या भावासाठी पुणतांबा येथे अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींना पोलिसांनी ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याच्या निषेधार्थ पुणतांबा ग्रामस्थांनी राहाता पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. तसेच शेतकरी कन्यांनीही त्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे. दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर तोडगा निघाला. त्यानंतरच लिंबूपाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले.

शेतमालाच्या भावासाठी पाच दिवसांपासून पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलक मुलींची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी तीन आंदोलक युवतींना ताब्यात घेऊन रात्री उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सदर आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने बळाचा वापर केला, असा आरोप करीत पुणतांबा ग्रामस्थांनी राहाता पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आंदोलक मुलींनी त्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवले होते. अखेर आज दुपारी आंदोलनावर तोडगा निघाला. दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री अर्जुन खोतकर यांनी आंदोलन मुलींसोबत चर्चा केली या चर्चेनंतर तोडगा निघाला व शेतकरी कन्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.