संभाजी भिडेंवर अटक ‘वॉरंट’ !

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचे  आदेश देण्यात आले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात 2018 मध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्याच खटल्यावर काल सुनावणी होती ज्याला भिडे हजर राहिले नाहीत, त्यामुळे न्यायाधीशांनी कडक भूमिका घेत त्यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्याचे आदेश दिले.

येळ्ळूर येथे 13 एप्रिल 2018 साली कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भिडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठीची आचारसंहिता लागू होती परंतु भिडे यांनी या समारंभात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांंना विजयी करण्याचे आवाहन केले होते.

म.ए. समितीच्या उमेदवारांच्या विरोधातील उमेदवारांना त्यांची जागा दाखवावी. अनेक कुस्तीची मैदाने पाहिली आहेत, येळ्ळूर मैदानासारखी कुस्ती पाहिली नाही असेही भिडे म्हणाले होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी भिडे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. त्यांच्यावर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

भिडे यांच्यासह कुस्ती स्पर्धा आयोजक यांना मिळून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्या खटल्याची सुनावणी गुरुवारी झाली. यावेळी सहा जण उपस्थित होते. तर उर्वरित चौघांपैकी मारुती कुगजी यांचे निधन झाले आहे. तर भिडे यांच्यासह अन्य दोघे गैरहजर होते. त्यापैकी भिडे यांच्यावर अटक वारंट बजावण्याचा आदेश न्यायालायने दिला. खटल्याची पुढील सुनावणी 24 मार्चला आहे. बचाव पक्षाकडून अ‍ॅड. शामसुंदर पत्तार आणि अ‍ॅड. हेमराज बेंच्चण्णावर काम पाहत होते.