Corona Vaccine : भारत बायोटेक, सीरमवर आणखी मोठी जबाबदारी, नाकावाटे ‘कोरोना’ लसीच्या चाचण्या सुरू होणार !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   देशात ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असताना आणखी एका लसीची चाचणी सुरू होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ही लस इंजक्शनद्वारे घ्यायची नसून नाकावाटे घ्यायची आहे.

देशात कोरोनाचा प्रकोप आता निवळताना दिसत आहे. डिसेंबरपर्यंत 7 ते 8 कोटी कोरोना लसीचे डोस तयार करण्याचा दावा सीरम इंस्टिट्युटनं केला आहे. तसंच मार्चपर्यंत कोरोना लस भारताला मिळणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

देशाचे आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सांगितलं की, सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या कंपन्या भारतात इंट्राझोनल कोरोना लसीची चाचणी सुरू करणार आहेत.

सध्या भारतात एकाही नाकावाटे घेण्यात येणाऱ्या कोरोना लसीची चाचणी सुरू नाहीये. मात्र येत्या काही महिन्यात सीरम इंस्टिट्युट आणि भारत बायोटेकला परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळं या कंपन्या नोझल लसीची चाचणी सुरू करू शकतात असंही हर्षवर्धन यांनी सांगितलं.

लसीच्या चाचणीच्या अंतिम टप्प्यात हजारो लोक सहभागी होतात. कधी कधी 30000 ते 40000 लोक असतात. सध्या जी चाचणी सुरू आहे ती इंजक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची आहे. नोझल द्वारे एकही लस चाचणी सुरू नाही असंही ते म्हणाले.

नुकतीच रशियाच्या लसीला भारतात क्लिनिकल ट्रायल घेण्यास मंजुरी देण्यात आलीआहे. डीसीजीआयनं कोरोना व्हायरस विरोधात रशियाची व्हॅक्सिन स्पुतनिक -5 टच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला मंजुरी दिली आहे.

हैदराबादची औषध निर्माता कंपनी डॉ रेड्डीज लॅबोरेटरीजनं शनिवारी ही माहिती दिली. डीआरएल आणि रशियाच्या सरकारी निधी मंत्रालयासोबत भारतानं करार केला होता. यानुसार या लसीची चाचणी आणि वितरण करण्यात येणार आहे.

संशोधकांनी थंडीच्या दिवसात कोरोना रौद्ररूप धारण करण्याची भीती वर्तवली आहे. सोबतच निती आयोगाच्या पदाधिकाऱ्यानं हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

उन्हाळ्यात कोरोना व्हायरस पसरण्याचं मुख्य कारण म्हणजे हवेत असलेल्या बाष्पकणांवर कोरोना व्हायरस असल्यानं आणि ते लोकांच्या संपर्कात नाकावाटे किंवा अन्य माध्यमातून आले आहेत असं संशोधकांनी म्हटलं आहे.

तर हिवाळ्यात सर्दी झाल्यास येणाऱ्या शिंका, श्वास सोडणं, खोकणं, आदी कारणातून कोरोना व्हायरस तोंड आणि नाकावाटे थेंबाच्या माध्यमातून बाहेर पडण्याची शक्यता आहे हे थेंब हवेतून अन्य लोकांच्या संपर्कात आल्यास कोरोना पसरण्याची शक्यता आहे असं संशोधकांनी म्हटलं आहे.