मंदिर बंदी आणि महिला अत्याचाराविरोधात भारतीय जनता पार्टीचं राज्यभर आंदोलन

मुंबई : महिलांवरील अत्याचारांमध्ये राज्यात झालेली वाढ आणि मंदिरे उघडण्यास राज्य सरकार परवानगी देत नसल्याने राज्य भाजपाने सोमवार 12 व 13 ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या पत्रकार परिषदेत आंदोलनाची माहिती देताना केशव उपाध्ये म्हणाले की, बार उघडण्यास परवानगी महाआघाडी सरकारने दिली. मात्र, मंदिरे उघडण्याची अजून परवानगी नाही. या विरोधात 13 ऑक्टोबर रोजी भाजपा राज्यभर आंदोलन करणार आहे. शिर्डीत भाजपा प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. यात संत, महाराजांच्या बरोबर मंदिरांवर उपजीविका अवलंबून असणारे छोटे व्यापारी सहभागी होणार आहेत.

महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे आणि प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की, महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला, तरुणी, बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री या घटनांची गंभीरपणे दखल घेत नाहीत. म्हणूनच आम्ही या असंवेदनशील सरकारविरोधात 12 ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन करणार आहोत. आंदोलनात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सहभाग घेणार आहेत.

पुण्यात कृषी कायद्यांच्या स्वागतासाठी यात्रा
केशव उपाध्ये यांनी नव्या कृषी कायद्याच्या स्वागतासाठी पुण्यात भाजपाकडून आयोजित करण्यात येणार असलेल्या ट्रॅक्टर यात्रेबाबत माहिती देताना म्हटले की, मोदी सरकारने केलेल्या 3 कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी राज्यभर आनंदोत्सव साजरा केला जाईल. या उप्रकमाचा शुभारंभ 12 ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील वरवंड ते चौफुला अशी ट्रॅक्टर यात्रा काढून होणार आहे. या यात्रेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी होणार आहेत.