‘अश्लील’ गाण्यात घेतलं महात्मा गांधींचं नाव ! ‘सिंगर’ अंतरा सिंह प्रियंकाविरोधात FIR

पोलीसनामा ऑनलाइन – भोजपुरी सिंगर अंतरा सिंह प्रियंका हिला आपल्या गाण्यात महात्मा गांधींचं नाव घेणं महागात पडलं आहे. झारखंडची राजधानी रांचीतील एका कार्यक्रमादरम्यान एका अश्लील गाण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधींचं नाव घेण्याचा प्रियंकावर आरोप आहे. छोटा नागपूर खादी ग्राम उद्योगनं या प्रकरणी मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, हे गाणं तर अश्लील आहेच सोबत प्रियंकानं या गाण्यादरम्यान गांधीजींचं चुकीच्या पद्धतीनं नाव घेतलं आहे असा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदारानं सांगितलं की, “प्रियंकाच्या या गाण्यात देशातील महापुरुषांचा अपमान करण्यात आला आहे.” पोलिसांनी या प्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली आहे. प्रियंकानं आतापर्यंत अनके हिट भोजपुरी साँग गायले आहेत. आता या प्रकरणात नाव आल्यानं प्रियंकाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

काही दिवसांपूर्वीच प्रियंका बुलाती है मगर जानें का नई या गाण्यामुळं चर्चेत आली होती. उर्दूचे प्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांच्या शेरातील ही ओळ आहे. या ओळीचं साँग व्हर्जन खूप व्हायरल होताना दिसलं. या शायरीवर भोजपुरी इंडस्ट्रीतील दोन प्रसिद्ध महिला सिंगर्सनं गाणं गायलं आहे. दोन्ही गाणीही खूप पसंत केली गेली.