भोसरीत पिस्टलसह तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बेकायदेशीररित्या घातक हत्यारे बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पिस्टल, जीवंत काडतूस आणि कोयता आणि तांब्याच्या वस्तू चोरणाऱ्या चोरट्याकडून देखील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये भोसरी पोलिसांनी 1 लाख 53 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राजेश ऊर्फ मुन्ना रविशंकर तिवारी (वय२३ रा. मोरे वस्ती चिखली), अविनाश महादेव जाधव (वय २२ रा. लांडेवाडी), रमजान मुशाक कुरणे (वय २६ रा. मोरे वस्ती चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. तर तांब्याचे साहित्य चोरीप्रकरणी विकास जीवन गुंजाळ (वय २६ रा. शांतीनगर) याला अटक करून तांब्याच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भोसरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान पोलीस कर्मचारी आशिष गोपी यांना गुडवील चौकातील सी.एन.जी पेट्रोल पंपाजवळ तीन व्यक्ती घातक हत्यारांसह थांबले असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकातील पोलीसांनी सापळा रचून या तिघांची अंगझडती घेतली. यात त्यांच्याकडून एक पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन लोखंडी कोयते अशी हत्यारे मिळाली आहेत. या तिघांविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अविनाश जाधव हा सराईत गुन्हेगार असून याला एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तर तांब्याचे साहित्य चोरीप्रकरणी पोलीस कर्मचारी समीर रासकर आणि सुमीत देवकर यांनी गुंजाळ याच्याकडून तांब्याचे साहित्य जप्त केले आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ १ च्या स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक गुन्हे देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, संतोष महाडिक, विकास फुले, बाळासाहेब विधाते, सागर जाधव यांच्या पथकाने केली.

You might also like