निविदा मंजूर होण्यापूर्वीच उड्डाणपुलाचे तिसऱ्यांदा भूमीपूजन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – उड्डाणपुलाच्या कामाची निविदाही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. तरीही या उड्डाणपुलाचे शुक्रवारी (दि.८) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भूमिपूजन सोहळा आयोजित केला आहे. खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत आज सकाळी याबाबतची घोषणा केली. निविदा मंजूर झालेली नसतानाच भूमिपूजनाचा टीकेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे या उड्डाणपुलाचे यापूर्वी दोनदा भूमिपूजन करण्यात आलेले आहे.

पत्रकारांशी बोलताना खा. गांधी म्हणाले की, ‘पुणे – नगर हायवे शहरातून गेला आहे. २००६ मध्ये या हायवेचा विस्तार झाला. चेतक एन्टरप्राईजेस या ठेकेदाराकडे त्याचे काम होते. शिरूर ते नगर रस्त्याच्या कामात ७० कोटी रुपयांचा एकेरी उड्डाणपुल हा ठेकेदार करणार होता. सध्याचे सगम हॉटेल ते नेवासकर पंपापर्यंतचा हा उड्डाणपुल होणार होता. तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दोनदा उड्डाणपुलाचे भूमिपूजनही केले होते. ठेकेदाराला मारहाण झाल्याने त्याने काम सुरू होण्यापूर्वीच सोडले. केंद्रात सत्तांतर होऊन भाजपचे सरकार विराजमान झाले. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या मंजुरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला.’

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘नगर शहरातून कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी साडेचारशे कोटी रुपये मंजूर केले होते. त्याच वेळेस त्यांचे या उड्डाणपुलाकडे लक्ष वेधले. उड्डाणपुलाचा डीपीआर करण्यासाठी ध्रुव कन्सलटंट कंपनीची नियुक्ती करण्यात आली. सुरूवातीला साडेसातशे कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. त्यातून सक्कर चौक ते डीएसपी चौक दरम्यान उड्डाणपुल प्रस्तावित होता. पूर्वीच्या चेतक कंपनीकडून उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा ७० कोटी रुपयांचा निधी वगळून हा रस्ता राष्ट्रीय महामार्गकडे वर्ग करायचा होता. दीड वर्षाच्या विलंबानंतर चेतककडून काम वगळल्याचं पत्र दिलं गेलं. त्यानंतर शासनाकडून एनओसी आली, ती केंद्राकडे पाठविली. या दीड वर्षाच्या काळात कल्याण-विशाखापट्टणम ह्या राष्ट्रीय महामार्गाचे काम वाढत गेलं अन् राष्ट्रीय महामार्गासाठी दिलेले साडेसातशे कोटीही अपुरे पडले. पर्यायाने नगरच्या उड्डाणपुलास केवळ साडेतीनशे कोटी मिळू शकले. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते सदर उड्डाण पुलाचे भूमिपूजन करण्यात येईल.’

…पण उड्डाणपूल होणार का ?


नगर शहरातील उड्डाणपुलाचे यापूर्वी दोनदा भूमिपूजन करण्यात आले. मात्र उड्डाणपूल होऊ शकला नाही. आता तिसऱ्यांदा निविदा मंजूर होण्यापूर्वीच भूमिपूजनाचा मुहूर्त शोधून राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे खरेच बांधकाम होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

ह्याही बातम्या वाचा –धक्कादायक ! अल्पवयीन विद्यार्थीनीवर ४ कंडक्टरचा सामुहिक बलात्कार 

साईभक्तांसाठी मुंबई-शिर्डी स्वतंत्र पालखीमार्ग 

आ. कांबळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मागे 

‘..तर पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोर कला सादर करू’ 

विद्यार्थ्याच्या खिशात कॉपी ऐवजी सापडले ‘हे’ पत्र