शिक्रापुर पोलिसांची मोठी कारवाई ! बिबट्याच्या कातड्याची तस्करी करणारे दोघे अटकेत

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत शिक्रापूर येथे दोन इसम बिबट्याच्या कातड्याची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली असता शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत दोघांना बिबट्याच्या कातड्यासह तसेच दुचाकीसह जेरबंद करण्यात आलेआहे. याप्रकरणी दत्तात्रय देवराम शिंदे व दादासाहेब रामदास थोरात असे अटक करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत.

याबाबतीत मिळालेल्या माहिती नुसार शिक्रापूर येथील शिक्रापूर तळेगाव ढमढेरे रोड लगत त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालय जवळ काही युवक बिबट्याच्या कातड्याची विक्री करत तस्करी करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांना मिळाली.

त्यांनतर त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना माहिती देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस हवालदार सहदेव ठुबे, अमरदिन चमनशेख, पोलीस नाईक सचिन मोरे, संतोष शिंदे, योगेश नागरगोजे, मिलिंद देवरे, किशोर शिवणकर, निखील रावडे, अशोक केदार, राहुल वाघमोडे, प्रताप कांबळे, प्रतिक जगताप आदींनी त्या ठिकाणी सापळा लावला असता त्या ठिकाणी दोन संशयित युवक दुचाकीहून आले असल्याचे सदर पोलीस पथकाला दिसून आले.

त्यावेळी पोलिसांच्या पथकाने त्या युवकांच्या जवळील असलेल्या पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये काळे टिपले असलेले बिबट्याचे कातडे मिळून आले, यावेळी पोलिसांनी त्या युवकांना ताब्यात घेत त्यांच्या कडून अंदाजे दहा लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे जप्त केले असून शिक्रापूर पोलिसांनी दत्तात्रय देवराम शिंदे (वय ३० वर्षे रा. पळवे ता. पारनेर जि. अहमदनगर) व दादासाहेब रामदास थोरात (वय ३४ वर्षे रा. वाळवणे ता. पारनेर जि. अहमदनगर सध्या रा. शिरूर ता. शिरूर जि. पुणे) या दोघांवर वन्य जीव अधिनियमन अंतर्गत गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके हे करत आहे.