केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आयुर्वेदाच्या शल्य, शालाक्य डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आयुर्वेद शाखेच्या शल्य (जनरल सर्जरी) आणि शालाक्य (इएनटी) डॉक्टराबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमात त्या-त्या विषयांतील विविध शस्त्रक्रियांचा अभ्यास समाविष्टच आहे. या विषयांतील डॉक्टरांचाही शस्त्रक्रिया करणे, हा हक्कच असल्याचे सांगत भारत सरकारने या डॉक्टरांना आता शस्त्रक्रिया करण्यास परवानगी ( Doctors are now allowed to perform surgery) दिली आहे. भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद (स्नातकोत्तर आयुर्वेद शिक्षा) संशोधन विनियम, 19 नोव्हेंबर 2020 च्या भारत शासन निर्णयानुसार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शासनाच्या या निर्णयाचे निमा व निमा स्टुडन्ट फोरम, सोलापूर जिल्हा शाखेने स्वागत केले आहे.

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात शस्त्रक्रियांचा अभ्यास समाविष्ट असल्याने आयुर्वेद शल्यविशारद या शस्त्रक्रिया स्वतंत्रपणेही उत्तमरित्या करू शकतात. भारत शासनाचा हा निर्णय अगदी योग्य असून स्वागतार्ह आहे. आयुर्वेद शाखेच्या हितार्थ निर्णय घेतल्याबद्दल आभारी असल्याची प्रतिक्रिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदविली आहे. आयुर्वेद हे एक परिपूर्ण शास्त्र असून आधुनिक चिकित्सा पद्धतीने सुद्धा प्राचीन काळी होणाऱ्या शस्त्रक्रियांची नोंद घेतली आहे. निमा संघटना स्थापनेपासून इंटिग्रेशनचा पुरस्कार करीत आली असून या नोटिफिकेशन मधील मागणी आणि त्याचा युद्ध पातळीवर पाठपुरावा निमाने सतत केला आहे. आज त्याची पूर्तता झाल्याचे निमा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर यांनी सांगितले.

प्रसुती आणि स्त्री रोग विषयी पाठपुरावा करणार
शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करतो. प्रसूती तंत्र आणि स्त्रीरोग या दोन विषयांत पदव्युत्तर आयुर्वेद सर्जन डॉक्टरांविषयी देखील असाच निर्णय घेण्यात यावा, याचा पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद चे सदस्य डॉ. तात्यासाहेब देशमुख यांनी दिली आहे.