Pune News : पुणे महापालिकेच्या हद्दीतील सर्व शाळा जानेवारीच्या या तारखेपर्यंत बंद : महापौर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्य शासनाने 23 नोव्हेंबरनंतर शाळा सुरू करण्याचे आदेश काढल्यानंतर शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु, दिवाळीनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता, पुन्हा 3 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
राज्य शासनाच्या आदेशांनातर पुणे पालिकेने शिक्षकांना कोविड चाचणी करून घेण्याचा सूचना केल्या होत्या. दरम्यान, मुंबई पालिकेने 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांचा निर्णय स्थानिक संस्थांवर सोडला होता. शासनाच्या आदेशानंतर पालिकेने 23 नोव्हेंबरनंतर नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शाळा सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या शिक्षकांच्या कोरोना चाचण्या केल्या होत्या. त्यामुळे शिक्षकांच्या तपासणीसाठी रांगा लागल्या होत्या. यासोबतच पालकांकडून मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संमतीपत्र घेण्यास सुरुवातही केली होती. परंतु, पालकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. तसेच, मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुंबई पाठोपाठ पुण्यातही शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ही मुदत 3 जानेवारीपर्यंत लांबविण्यात आली आहे.

…तरीही धोका टळलेला नाहीः महापौर मोहोळ

पुणे पालिकेने 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या त्यापार्श्वभूमीवर रुग्णवाढीचा अंदाज घेऊन शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला होता. सद्यःस्थितीमध्ये कोरोना आटोक्यात येत असला तरी पूर्णपणे धोका टाळलेला नाही. मुलांना शाळेत पाठविण्याची पालकांची मनस्थिती नाही. त्यामुळे येत्या 3 जानेवारीपर्यंत शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.