Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये प्रचारादरम्यान उमेदवाराची हत्या, समर्थकांनी हल्लेखोराला संपवलं

पाटणा : प्रचार अंतिम टप्प्यात असताना बिहार निवडणुकीत एक अतिशय थरारक प्रकार घडला आहे. शनिवारी येथे एक उमेदवार प्रचारासाठी निघालेला असताना त्याची व एका कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर हल्लेखोराला उमेदवाराच्या समर्थकांनी घटनास्थळावरच पकडून जबर मारहाण केल्याने तोसुद्धा ठार झाला.

याबाबत सविस्तर अशी की, जनता दल राष्ट्रवादीचे शिवहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीनारायण सिंह हे शनिवारी प्रचार करत असताना पुरनहियामधील हथसार गावात लोकांच्या भेट घेत होते. यावेळी, दुचाकीवरून आलेल्या मोरकर्‍यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मारेकर्‍यांनी मारलेली गोळी त्यांच्या छातीत घुसल्याने ते जागीच ठार झाले. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

दरम्यान, श्रीनारायण सिंह रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर कार्यकर्ते संतापले होते. हल्लेखोर पळून जात असताना कार्यकर्त्यांनी एका हल्लेखोराला पकडले आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो जागीच ठार झाला. दरम्यान, गंभीर जखमी आवस्थेत श्रीनारायण सिंह यांना शिवहर सदर रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, आरोपी हे उमेदवाराचे समर्थक बनून गर्दीत घुसले होते. यानंतर त्यांनी अचानक श्रीनारायण यांच्याव बेछूट गोळीबार केला. या प्रकरणात फरारी असलेल्यांचा शोध सुरू आहे. मयत श्रीनारायण सिंह हेसुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. त्यांच्यावर दोन डझनहून जास्त गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती, याबाबत शिवहरचे एसडीपीओ राकेश कुमार यांनी दिली.