माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे दिग्गज नेता डॉ. रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन, AIIMS मध्ये घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे दिग्गज नेता डॉ. रघुवंश प्रसाद सिंह यांचं आज (रविवार) निधन झालं. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे अत्यंत निकटवर्ती असलेल्या रघुवंश प्रसाद सिंह यांनी दिल्लीमध्ये एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. बिहारच्या राजकारणामध्ये त्यांना रघुवंश बाबू म्हणून ओळखलं जात होतं. काही दिवसांपुर्वी त्यांना एम्समध्ये भरती करण्यात आलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून रघुवंश प्रसाद सिंह यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. एम्समध्ये रघुवंश बाबू यांच्यावर 4 डॉक्टर देखरेख करत होते. आयसीयुमध्ये असलेल्या रघुवंश यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. 4 ऑगस्टपासून रघुवंश प्रसाद सिंह यांच्यावर दिल्लीच्या एम्स हॉस्पीटलमध्ये उपचार चालू होते. मात्र, गेल्या 4 दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. दरम्यान, दोन दिवसांपासून रघुवंश सिंह यांनी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) सोडण्याचा निर्णय घेत लालू प्रसाद यादव यांच्याकडे राजीनामा पाठविला होता. गेले 32 वर्ष रघुवंश सिंह आणि लालू प्रसाद यादव यांच्यासोबत होते. रघुवंश प्रसाद सिंह हे 74 वर्षाचे होते.