बर्ड फ्लू’चा धसका : खवय्यांची चिकनकडे पाठ, मटण, मासळी विक्रेत्यांना सुगीचे दिवस, मटणाच्या दरात 200 रुपयांनी वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राज्यभरात बर्ड फ्लू’ने हाहाकार माजवल्याने भीतीपोटी अनेकांनी चिकन, अंडी खाण्याकडे पाठ फिरवली आहे. खवय्यांनी मटण आणि मासे खाण्याला पसंती दिल्याने मटणाचे दर किलोमागे 200 रुपयांनी वाढले आहेत. तसेच मासळीच्या मागणीतही वाढ झाल्याने त्यांचेही दरही वाढले आहेत. त्यामुळे मटण, मासळी विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून चिकनचा ग्राहक मटणाकडे वळाल्याने मटणाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नुकताच गुरुवारी मार्गशीर्ष महिना संपला. त्यानंतर रविवारपासून खवय्यांनी मासांहार करण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी बर्ड फ्लू’च्या भीतीने अनेक चिकन शॉप ओस पडली होती. तर मटणाच्या दुकानात तसेच मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली. त्यामुळे ऐन हंगामात चिकन विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे. मुंबईत अद्याप तरी ‘बर्ड फ्लू’चा प्रभाव नसला तरी ग्राहक चिकन खाणे टाळत आहेत.

कोरोनामुळे चिकन विक्रेत्यांचे कंबरडे मोडले त्यात आता ‘बर्ड फ्लू’मुळे ही प्रचंड नुकसान होत असल्याचे भायखळा येथील चिकन विक्रेते समीर नाईक यांनी सांगितले. तर हॉटेल व्यावसायिक प्रतीम सिंग म्हणाले की, बर्ड फ्लूमुळे 50 टक्के मांसाहारी पदार्थांची विक्री कमी झाली आहे. त्यात मच्छी आणि मटणाच्या खरेदी दरात 15 टक्के वाढ झाली. तर दुसरीकडे बर्ड फ्लूमुळे खवय्यानी सध्या मांसाहारी खाणेच नापसंत केले आहे.

मटण शॉपवर येणाऱ्या ग्राहकांची संख्या 40 ते 50 टक्के वाढल्याने मटणाची मागणी वाढली आहे. पर्यायाने मटणाचे दर ही वाढले असून किलोमागे 150 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी मटणाचा दर 600 रुपये होता तो आता 750 रुपयांच्यावर पोहोचला असल्याचे दि बॉम्बे मटण डीलर असोसिएशनचे उपाध्यक्ष जुल्फिकार इस्माईल यांनी सांगितले.

मुंबईत राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधून बकरे येतात. मात्र बर्ड फ्लूमुळे बकऱ्यांचे दर ही वाढले आहेत. बकऱ्यांचे दर 4 ते 6 हजार रुपये होते ते त्यात आता 2000 ते 2500 रुपयांची वाढ झाल्याचे मटण विक्रेते नाना मुस्ताक यांनी सांगितले. मात्र मुंबईत येणाऱ्या बकऱ्यांना ठाणे, पुणे, नाशिकमधून देखील खरेदी वाढल्याचे त्यांनी सांगितले. चिकनकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने रविवारी मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी दिसली. ग्राहक वाढले असले तरी समुद्रात मासळी कमी सापडत असल्याने मासळीचा तुटवडा आहे. पर्यायाने मासळीचे दर ही 40 ते 50 टक्क्यांनी वाढल्याचे मासळी पुरवठादार संतोष पवार यांनी सांगितले.