खुर्चीवरून आदित्य ठाकरे यांच्यासमोर भाजप-शिवसेना आमदारांमध्ये ‘जुंपली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमध्ये आज जिल्हा नियोजन बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये पालकमंत्री असलम शेख यांच्या समोर भाजपा आणि शिवसेना आमदारांमध्ये खुर्चीवरून मोठा वाद जाला. पालकमंत्री असलम शेख यांच्या जवळ आदित्य ठाकरे एका बाजूला बसले होते. तर दुसऱ्या बाजूला मोकळ्या खुर्चीवर भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर हे बसण्यासाठी गेले. त्यावर शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि मनीषा कायंदे यांनी हरकत घेतली.

मुंबईतील सर्वात ज्येष्ठ आमदार कोळंबकर हे पालकमंत्र्यांच्या जवळील खुर्चीवर बसतील असा सूर भाजपच्या इतर लोकप्रतिनीधींनी या बैठकीत लावला. त्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या आमदारामध्ये खुर्चीवर बसण्यावरून वाद झाला. खुर्चीवर बसण्यावरून दोन आमदारांमध्ये झालेल्या वादामुळे बैठकीमध्ये काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे काही वेळासाठी ही बैठक स्थगित करण्यात आली. दोन आमदारांमध्ये सुरु असलेला वाद वाढत असल्याचे दिसून येताच पालकमंत्री असलम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

मात्र, जिल्हा नियोजन बैठकीत विकास कामांवर शिवसेना-भाजप लोकप्रतिनिधी यांच्यातील मतभेद एक वेळ समजून घेतील पण खुर्चीवरून लोकप्रतिनिधींचा वाद होणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे. यापूर्वी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मानापामानाचे नाट्य रंगल्याचे ऐकायला मिळाले होते. राज्यातील तीन पक्षांचे सरकार आल्याने प्रत्येक पक्षाचे नेते हे आपला प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यामुळेच अशा वादाच्या घटना कायम बाहेर येत आहेत.

याआधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यातील वाद गाजला होता. तर औरंगाबादमध्ये शिवसेनेचे माजी खासदार आणि एमआयएमच्या खासदारांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर बसण्यावरून वाद झाले होते.

फेसबुक पेज लाईक करा –