भाजपचे मुंग्यांचे वारूळ उद्ध्वस्त होणार, आमदार हसन मुश्रीफ यांची टीका 

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप सरकारच्या कारकीर्दीत चार वर्षांमध्ये गोरगरीब जनतेला विविध निर्णयामुळे नाहक त्रास झाला. त्यामुळे भाजप सरकारचे मुंग्यांचे वारूळ येत्या निवडणुकीत उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

सेनापती कापशी येथील सरला गॅस एजन्सीतर्फे उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना गॅस, चिकोत्रा दूध संस्थेच्या सभासदांना बोनस व दीपावली भेटवस्तू वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, भाजप सत्तेच्या कुऱ्हाडीचा पहिला घाव गोरगरीब जनतेवर बसला आहे. या सरकारने गोरगरिबांसाठी असलेल्या अनेक पेन्शन योजना बंद केल्या. बंद पडलेल्या सर्व योजना पुन्हा सुरू करून २ हजार रुपयांपर्यंत पेन्शन दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकांत खोत म्हणाले, गेल्या विधानसभेला अनेक अडचणी असतानासुद्धा वावटळात दिवा लावण्याचे काम मुश्रीफ यांनी केले. येत्या निवडणुकीत कोणाचीही युती होवो अगर काहीही होवो, मुश्रीफ एकटे जरी असले तरी निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. पेटड्ढोल दरवाढ, नोटाबंदी, रेशन बंद, दारू ऑनलाईन असे अनेक त्रासदायक निर्णय घेणाऱ्या भाजपला जनता कंटाळली आहे, असे खोत म्हणाले. यावेळी मधुकर नाईक, सावित्री खतकल्ले, प्रवीण नाईकवाडी, सूर्यकांत भोसले, शामराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत मुश्ताक देसाई यांनी, तर प्रास्ताविक सुनील चौगले यांनी केले.

सूत्रसंचालन गुरुप्रसाद जोशी यांनी केले. राजेंद्र माळी यांनी आभार मानले. जि. प. सदस्या शिल्पा खोत, जोती मुसळे, कापशी ग्रा.पं. सदस्या ज्योती काळेबेरे, संगीता राजाराम, शालन रक्ताडे, संगीता कदम, अंकुश पाटील, प्रवीण नाईकवाडी, सूर्यकांत भोसले, संदीप उत्तुरे, राजूकाका भोसले, शेखर स्वामी, मुश्ताक देसाई, शशिकांत काकडे, करीम भालदार उपस्थित होते.