देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेट्रो ट्विट’ला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल, असा सवाल महाविकास आघाडी सरकारपुढे उपस्थित केला आहे. त्यावर फडणवीस यांच्या ट्विटला राष्ट्रवादीने उत्तर दिले आहे. फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोतील फोटो ट्विट करत मुंबई मेट्रोचे काम कधी पूर्ण होईल, अशी विचारणा केली. मुंबई मेट्रोचे काम जलद गतीने पूर्ण करण्याबाबत महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी ट्विट करत सांगितले आहे.

मुंबई मेट्रो-3 प्रकल्प महाविकास आघाडी सरकार लवकरच पूर्ण करेल, यात शंका नाही. केंद्र शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा अडथळा न आणता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत झाली, तर मुंबईकरांना दिलासा मिळेल आणि मुंबईकरांचीही हीच अपेक्षा आहे, असे तपासे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

फडणवीस यांनी काय म्हटल होत ट्विटमध्ये
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काही कारणास्तव नवी दिल्ली येथे गेले होते. त्यावेळी मेट्रोमधून प्रवास करण्याचा त्यांना योग आला. या प्रवासाबाबत त्यांनी ट्विटरवरून एक पोस्ट केली आहे. फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोतून प्रवास करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. ट्रॅफिकमध्ये लागणारा वेळ मेट्रोमुळे वाचल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल? असा सवाल उपस्थित केला आहे.