खासदार गांधी यांच्याविरुद्ध भाजप जिल्हाध्यक्षांनी थोपटले दंड

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागल्याने आता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनीच त्यांच्याविरुद्ध  दंड थोपटले आहे. बेरड यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे व श्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केल्याचे पत्रकार परिषदेत जाहीरपणे मान्य केले आहे. खासदार गांधी यांच्याविरुद्ध पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनीच दंड थोपटल्याने गांधी गटाचे धाबे दणाणले आहेत.
भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. बेरड म्हणाले की, मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. पक्षाने आजपर्यंत जी जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पार पाडली आहे. यापुढेही पक्ष जी जबाबदारी देईल, ती पार पाडण्यासाठी तयार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे. पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी केली असल्याचे सांगत पक्षश्रेठी निर्णय घेतील, तो मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शिवसेना व भाजपची युती होईल, अशी अपेक्षा व्यक्त करून युती न झाल्यास शिर्डीची जागाही भाजप लढवेल, असे त्यांनी सांगितले. भाजप अनुसूचित जाती मोर्चाने शिर्डीसाठी उमेदवारीची मागणी केल्यास त्यासाठी मी प्रयत्न करेल, असेही त्यांनी सांगितले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी उमेदवारीची इच्छा बोलून दाखविली. त्यामुळे आता गांधी गटाला चांगलाच हादरा बसला आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. बेरड यांच्या नथीतून पालकमंत्र्यांनी खासदार गांधी यांच्यावर तीर मारला आहे, असे बोलले जाऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून खा. गांधी यांचे पक्षांतर्गत विरोधक वाढत चालले आहेत. महापालिका निवडणुकीत खासदार गांधी  हे त्यांचा करिष्मा दाखवू शकले नाहीत. त्यांची कामगिरीही निराशजनक मानली जाते. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी उमेदवारीची इच्छा बोलून दाखवली आहे.