भाजपात दुफळी : अनिल गोटेंकडून नवीन पक्षाची घोषणा 

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – धुळे मनपा निवडणुकीपूर्वीच भाजपात दुफळी पडली आहे. धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटे यांच्याकडून नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून दगाफटका झाल्याने निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगतले आहे. अनिल गोटेंची पत्नी  हेमा या महापौर पदाच्या उमेदवार असणार आहेत.

धुळे महापालिकेची निवडणूक येत्या ९ डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गोटे यांचे मंत्री सुभाष भामरे यांच्याशी वाद सुरु होते. यामुळे गोटे यांनी आक्षेप घेतलेला व राजीनामा देण्याची घोषणा केली होती. रविवारी गोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत आपले आक्षेप मांडले होते . यानंतर मुख्यमंत्र्यांनी अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार नसून, धुळे महापालिकेची निवडणूक गोटे यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच प्रदेशाध्यक्ष दानवे गोटे यांच्या समस्या सोडवतील असेही सांगितले होते.

धुळे येथे प्रदेशाध्यक्षांसमोर गोटे समर्थकांचा गोंधळ
महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर येथे शनिवारी रात्री प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आदींच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात आमदार अनिल गोटे यांना भाषण करण्यास मज्जाव करण्यात आल्याने गोंधळ उडाला होता. या गोंधळामुळे गोटे यांना न बोलताच मेळाव्यातून बाहेर पडावे लागले होते.