अभिनंदन यांच्या सुटकेचे राजकारण केले जातेय : आनंदराज आंबेडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका झाल्याचा आनंद आहे पण त्यांच्या सुटकेचे राजकारण केले जातेय याचे दु:ख होतेय. पाकिस्तानच्या कुरापतींना चोख उत्तर देणाऱ्या सैन्यदलाच्या कर्तृत्वावर आपली पोळी भाजून घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याची टीका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मोदी सरकारवर केली.

यवतमाळ येथे प्रचार सभेसाठी आलेल्या पंतप्रधानांनी तेथून जवळच असलेल्या बुलढाणा येथील शहीद जवानाच्या अंत्ययात्रेला उपस्थित रहायला हवे होते. मात्र, ही असंवेदना दाखविणारे पंतप्रधान केवळ ‘मन की बात’ ऐकविण्यातच मश्गुल आहेत. आता निवडणुकीमध्ये जनता त्यांना ‘जन की बात’ दाखवून देतील असा इशारा देखील त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

वंचित बहुजन आघाडीच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत असून राजकारणातील ही पोकळी आघाडी भरून काढेल, असा विश्वास व्यक्त करीत प्रस्थापित नेत्यांविरूद्ध महाराष्ट्रातील जनता मतदान करेल. आंबेडकरी चळवळ मजबूत व्हावी या उद्देशातून रिपब्लिकन सेनेने वंचित बहुजन आघाडीकडे जागांची मागणी केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोदी लाट ओसरली असून ‘एकला चलो रे’ ही परिस्थिती राहिली नसल्याने भाजपला नाकदुऱ्या काढून शिवसेनेला बरोबर घेणे भाग पडले आहे. या दोन पक्षांची युती झाली असली तरी एकी झाली नसल्यामुळे परस्परांचे उमेदवार पाडण्याचेच काम केले जाईल, याकडे आंबेडकर यांनी लक्ष्य वेधले.