पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांच्या घरावर हत्येच्या धमकीचे पोस्टर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांपासून सुरु झालेल्या पश्चिम बंगालमधील हिंसक प्रकार थांबण्यास तयार नाहीत. भाजप कडून विविध ठिकाणांहून काढण्यात येणाऱ्या विजययात्रेला पश्चिम बंगाल मधून विरोध होताना दिसत आहे. असे असताना पश्चिम बंगालमध्ये ‘जय बंगला’चे नारे देणारे पोस्टर्स जागोजागी लावून भाजप नेत्यांना धमकवण्याचे प्रकार घडताना दिसत आहे. या धमकीमध्ये म्हणण्यात आले आहे की जर भाजप कार्यकर्ता कोठेही विजय यात्रा काढतील तर त्यांची हत्या करण्यात येईल.

शुक्रवार बर्दवान येथील रथतला येथे अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर जय बंगला असे लिहलेले माओवादी पद्धतीने पोस्टर चिटकवण्यात आले. या पोस्टरमध्ये यात्रेत सहभागी झालात किंवा झेंडा लावलास त्यांची हत्या करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली आहे. भाजपने टीएमसी कार्यकर्त्यांवर हे पोस्टर चिटकवल्याचा आरोप केला आहे.

बर्दवान भाजप नगर समितीचे सदस्य प्रशांत राय यांनी सांगितले की मागील 4 तारखेलाच त्यांनी विजय यात्रेची परवानगी घेतली होती, परंतू गुरुवार अचानक प्रशासनाकडून त्यांना सूचना पाठवण्यात आली की ते विजय यात्रेचे आयोजन करु शकत नाहीत.

प्रशांत राय यांनी असे देखील सांगितले की त्यांच्या घराबरोबरच अन्य भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरावर जय बंगलाचे नारे देणारे पोस्टर लावण्यात आले होते. ज्या यात्रेत सहभागी झाल्यास हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांनी बर्दवान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे देखील सांगितले. या सगळ्या मागे टीएमसी च्या कार्यकर्त्यांचा हाथ असल्याचा आरोप त्यांनी टीएमसीवर केला आहे. आपण या प्रकाराचा निषेध म्हणून आंदोलन करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.