नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सध्या महाराष्ट्रात ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरु आहेत. त्यानंतर लगेचच काही महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका देखील लागणार आहेत. २०२१ हे वर्ष निवडणुकांचं असणार आहे. देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठेची मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, वसई विरार महानगरपालिका, औरंगाबाद तसेच कोल्हापूर महापालिकांच्या निवडणूक आहेत. या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

दरम्यान, मुंबईच्या भाजप निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी अतुल भातखळकरकडे सोपवण्यात आली आहे. तर आता आशिष शेलार यांच्याकडे नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आशिष शेलार यांची निवड नवी मुंबई भाजप निवडणूक प्रभारीपदी झाली आहे. भाजप अधिक तीव्रतेने निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.

भारतीय जनता पक्षाने इतर महापालिकेमधील निवडणूक प्रभारींची नवे देखील निश्चित केली आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून गणेश नाईक, निवडणूक सहप्रमुख म्हणून मंदा म्हात्रे, निवडणूक संघटनात्मक प्रमुख म्हणून संजय उपाध्याय तर निवडणूक प्रभारी म्हणून आशिष शेलार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक प्रमुख म्हणून रवी चव्हाण तर निवडणूक प्रभारी म्हणून संजय केळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून प्रसाद लाड जबाबदारी सांभाळतील. निवडणूक सहप्रभारी म्हणून जयप्रकाश काम पाहतील. मुंबईमध्ये नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप कशा प्रकारे लोकांसमोर जाईल, निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असेल यावर चर्चा करण्यात आली सोबतच भाजपकडून विविध जबाबदाऱ्यांचे वाटप देखील करण्यात आले.