‘मी म्हणालो होतो ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर आहेत’; भाजपा आमदाराचा निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव जिल्ह्यातील महिला वसतिगृहाच्या गैर प्रकाराबद्दल राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलेला खुलासा हा सुसंस्कृत महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारा आहे, असे भाष्य अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे केले आहे. तसेच मी म्हणालोच होतो ठाकरे मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर आहेत, असं म्हणत ठाकरे सरकारवर भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.

जळगाव येथील गणेश कॉलनी भागातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत बोलताना, म्हणाले, जळगावा येथील कथित घटनेबाबत विविध खात्यांतील सहा महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने वसतिगृहातील सर्व १७ महिलांशी चर्चा केली. ४१ जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत. तर यामध्ये कोणतेही गैरकृत्य घडलं नसल्याचा निष्कर्ष समितीने अहवालात काढला असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे की, तक्रारदार महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे निदर्शनास आले आहे. महिला वसतिगृह असल्याने तिथे पुरुष अधिकारी आत जाऊ शकत नाही. पोलिसांनी त्या कथित घटनेचा व्हिडीओ काढला असे सांगितले जात असले तरी असा कोणताही व्हिडीओ पुरावा म्हणून समितीला मिळाला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.