‘…तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का? लवकरच तेराव घालावे लागेल’; भाजप नेत्याची टीका

मुंबई : केंद्र सरकारला शेतकरी आंदोलन, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेवरून कुंभकर्णाची उपमा देत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.ट्विट करताना देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये गेली आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकाला जाग येणार तरी केव्हा ? असा सवाल उपस्थित केला आहे तसेच ‘वर्ल्ड स्लीप डे’ असं टॅग करत जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला टोलाही लगावला होता. ३०० च्यावर शेतकऱ्यांनी शेतकरी आंदोलनात आपले प्राण गमावले. बेरोजगारी वाढत आहे.

इंधन दर वाढ या सर्व घडामोडींमुळे देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?,” असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता. मात्र आता जयंत पाटलांच्या ट्विटवर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनीही ट्विट करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

 

 

ट्विट मध्ये भातखळकर म्हणाले की, राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांना एवढी गाढ झोप लागली आहे की, आपल्या खात्यातील अधिकारी काय प्रताप करताहेत हे देखील त्यांना कळले नाही. केंद्र सरकारवर दुगाण्या झाडण्यापेक्षा आधी त्यांना झोपेतून जागे करा. केंद्र सरकार निद्रिस्त असेल तर ठाकरे सरकारला मृतवत म्हणावे का?, असा सवाल उपस्थित करत लवकरच तेरावं घालावे लागेल, असा टोला देखील त्यांनी लगावला.

यापूर्वीही जयंत पाटलांनी साधला होता निशाणा-
जयंत पाटील यांनी तर या पूर्वीही केंद्र सरकारवर कोरोना लसीकरणावरून निशाणा साधला होता. कोरोनाची लस आधी देशातील लोकांना द्या आणि मग जगभरात पाठवा, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. केंद्राचं धोरण भारतात लस नसली तरी चालेल, पण परदेशात पाठवा असं आहे. जगभरामध्ये लसींची निर्यात करण्यात केंद्र सरकार आघाडीवर आहे. लसीकरणाला जगभरात विशेष म्हणजे पाकिस्तान जे आपले मित्र राष्ट्र आहे त्याला आपण मदत करत आहोत, असा टोला पाटील यांनी लगावला होता.