‘बलात्काराचे खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मांवर तात्काळ कारवाई करा’

पोलीसनामा ऑनलाईनः राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. परंतु आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी मुंडे विरोधातील तक्रार मागे घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया देत तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यामुळे ज्या ख-या पिडीता आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो, हे समाजाच्या हिताचे नाही, म्हणून खोटे आरोप करणा-यांना शिक्षा व्हायलाच हवी,असेही वाघ म्हणाल्या.

मुंडेवर बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभर भाजप महिला मोर्चातर्फे आंदोलनही करण्यात आले. याबाबत चित्रा वाघ म्हणाल्या, मुंडेंवर ज्यावेळी बलात्काराचा आरोप झाला हे आमच्यासाठी धक्कादायक होत. आमच्यासाठी हे प्रकरण धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांच्यापुरतं मर्यादित नव्हते. आम्ही चुकीचे उदाहरण महाराष्ट्रापुढे जाऊ देणार नाही ही आमची भूमिका होती आणि म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागितला होता. खोटे आरोप करणे आणि गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे राजकीय कार्यकर्ता असो किंवा सामान्य व्यक्तीही असो तो उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. तपासकार्य सुरू असताना हा गुन्हा मागे घेतला आहे त्यामुळे खोटे आरोप केल्याबद्दलच्या कलमांतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी, असे वाघ म्हणाल्या.