भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन; दिल्लीत सुरु होते उपचार

अहमदनगर : भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर चे माजी खासदार दिलीप गांधी यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. नुकतीच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती़ नवी दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिलीप गांधी यांनी महाविद्यालयीन जीवनापासून भाजपाच्या कामाला सुरुवात केली. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी अहमदनगर शहराध्यक्षपदाची जबाबदारी यांनी पार पाडली. अहमदनगर पालिकेचे ते १९८५ ते १९९९ पर्यंत उपाध्यक्ष होते.

१९९९ मध्ये ते अहमदनगरमधून लोकसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये दुसर्‍यांदा त्यांना यश मिळाले. २०१४ मध्ये ते तिसर्‍यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. २००० ते २००४ दरम्यान त्यांनी ग्रामीण विकास समितीवर काम केले होते. राजकीय कारणांमुळे २०१९ मध्ये त्यांना लोकसभेचे तिकीट भाजपने नाकारले होते.