मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी; भाजप नेते म्हणतात -‘हे ठाकरे सरकारचं पाप, बदली नको निलंबन करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सचिन वाझे प्रकरणात बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडी सरकारने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी केली. मुंबई पोलीस दलात राज्य सरकारने मोठे बदल करुन हेमंत नगराळे यांची मुंबईच्या नवीन पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती केली. परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर भाजपमधून वेगवगेळ्या प्रतिक्रिया येत आहे.

अंबानी यांच्या अँटिलिया बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये 19 जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करणारे मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांनाच एनआयएने अटक केली. सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. तर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना निलंबित करा अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली. अखेर आज महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली. सरकारने घेलेल्या या निर्णयानंतर भाजप नेत्यांनी सरकारला घेरलं आहे.

हे ठाकरे सरकारचं पाप – शेलार
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सरकारवर टीका करताना खोचक टोला लगावला आहे. शेलार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एका सामान्य नागरिकाचा खून, एका एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांचं बंडल, नोटा मोजण्याचे मशीन, गाडीत नंबर प्लेटचा खच. त्यावरुन मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या. असा खोचक टोला शेलार यांनी लगावला आहे. तसेच दुर्दैवानं इतकं मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे, असे शेलार यांनी म्हटले आहे.

बदली नको निलंबन करा – भातखळकर
भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी पोलीस आयुक्तांच्या बदलीनंतर ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी परमबीर सिंह यांची बदली पुरेशी नसून ठाकरे सरकारने त्यांचे तात्काळ निलंबन करायला पाहिजे. अँटिलिया प्रकरणात त्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी. कायदा सुव्यवस्थेचा बट्याबोळ करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही राजीनामा घ्यायला पाहिजे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.