भाजपचे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र, म्हणाले – ‘खुर्चीला मिठी, कारण कायद्याची भीती’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपने टीकास्त्र सोडले आहे. खुर्चीला मिठी, कारण कायद्याची भीती असे सध्याच्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे सूत्र आहे. ठाकरे सरकारला नैतिक अधिष्ठान नाही. सत्तेसाठी तडजोड करून ते एकत्र आले आहेत. त्यात सध्याच्या राज्यातील घडामोडी पाहाता सत्तेतील तिन्ही पक्ष बदनाम झाले आहेत. सध्या तरी हिरेन हत्या आणि शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपातून परस्परांना वाचविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. सरकारमधून कोणी ही बाहेर पडले, तर अन्य पक्ष त्यांची पोलखोल करतील ही भीती या सर्वांना असल्याचे भाजपचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे‌ यांनी म्हटले आहे.

खासदार सहस्त्रबुध्दे म्हणाले की, सचिन वाझे हे शिवसेनेशी संबंधित होते. राष्ट्रवादीचे मंत्री अनिल देशमुख यांच्यावर पैसे वसुलीचे आरोप आहेत. काँग्रेसही या प्रकाराला पाठिशी घालत असल्याने या पक्षातील आमदारांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे. राष्ट्रवादीने किंवा शिवसेनेबरोबर भाजपच्या फेरजुळणीच्या शक्यतेबाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, की हे सर्व जर-तर चे प्रश्न आहेत, ते काल्पनिक आहेत. सध्या पश्चिम बंगाल निवडणुकीत कोलकाता शहरातील काही मतदार संघांची जबाबदारी सांभाळणारे सहस्रबुद्धे या निवडणुकीबाबत भाष्य करताना ते म्हणाले की, बॅनर्जीच्या कारभाराविरोधात जनतेचा रोष आहे. तृणमूल कार्यकर्त्यांच्या भ्रष्टाचार आणि गुंडगिरीमुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यात काँग्रेस-डावे हे ममता यांच्या विरोधात असल्याने मतविभाजनाचा फटका त्यांना बसणार आहे. सध्याच्या परिस्थितीत भाजपला पूर्ण बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास असल्याचे ते म्हणाले.