भाजपा म्हणजे घोषणांचा कारखाना ; खासदार अशोक चव्हाण

अंबाजोगाई : पाेलीसनामा ऑनलाईन-भाजपाचे सरकार म्हणजे घोषणांचा कारखाना होय. भाजपा सरकारने गेल्या साडे चार वर्षांमध्ये केवळ घोषणा केल्या आहेत. सरकार झोपी गेलेले नसून झोपेचे सोंग घेतलेले सरकार आहे. सरकारला खाली खेचे पर्यंत काँग्रेस संघर्ष चालूच ठेवणार आहे. राज्यात दुष्काळ पडलेला असताना शासन दुष्काळ जाहीर करत नाही. मध्यम व गंभीर दुष्काळ या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. मध्यम व गंभीर दुष्काळ म्हणजे नेमके काय हे कळायला मार्ग नाही. असे प्रतिपादन काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. ते जनसंघर्ष यात्रेनिमित्त  गुरूवार, दि.1 नोव्हेंबर 2018 रोजी अंबाजोगाई येथे शहरातील वंजारी वसतीगृहाच्या मैदानात आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते.

सध्या औरंगाबादला न्यायालयात प्रकरण सुरू असून दुष्काळाचा फक्त जीआर काढला आहे असे सांगितले गेले आहे. होणाऱ्या बैठकीत दुष्काळ जाहीर करू असे स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. सरकारने दुष्काळाच्या नावावर शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू केली आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर दुष्काळाची पाहणी रात्री मोबाईलच्या लाईट मध्ये करत असल्याने आश्चर्य वाटते. अशा प्रकारची पाहणी म्हणजे राज्यातील जनतेची टिंगलच आहे.

भाजपाने साडेचार वर्षांपूर्वी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? असा सवाल विचारला होता आता आम्हाला शिवसेना व भाजपाला असं विचारावं वाटते की कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा ? अगोदर सांगा. मुंबईचे भाजप आमदार कदम यांच्यावरही खासदार चव्हाण यांनी सडकून टीका केली. गुजरातमध्ये  झालेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याबाबत खासदार चव्हाण यांनी पंतप्रधान यांना युनिटी म्हणण्याचा अधिकार आहे काय ? असा सवाल विचारला पंतप्रधान सध्या फाळणी करण्याचे काम करत आहेत असा आरोप चव्हाण यांनी केला. देशाचे भविष्य अंधकारमय आहे संघर्ष आम्ही करू, तुम्ही सोबत राहा, जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा असे आवाहन यावेळी खासदार चव्हाण यांनी जनतेला केले.

देशाचे, संविधानाचे रक्षण करण्यासाठी भारतात धर्मनिरपेक्षता, सौहार्द टिकवण्यासाठी 2019 ला काँग्रेसला मत देवून भाजपला नेस्तानाबूत करा असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते व महाराष्ट्राचे प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. दरम्यान माजी खासदार रजनीताई पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले.

सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी खासदार .मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री प्रा.सुरेशराव नवले, प्रा.सत्संग मुंडे, प्रा.टि.पी.मुंडे, माजी आमदार सिराज देशमुख, माजी आमदार नारायणराव मुंडे, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, मिनाक्षीताई पांडुळे, दादासाहेब मुंडे, नगराध्यक्षा सौ.रचना सुरेश मोदी, नगराध्यक्ष आदित्य पाटील, प्रा.सर्जेराव काळे, डॉ.अंजलीताई घाडगे, राजेसाहेब देशमुख, बाबुराव मुंडे, संजय दौंड, अॅड.माधव जाधव, अजित चव्हाण, प्रा.विजय मुंडे, अ‍ॅड.अनंतराव जगतकर, एम.ए.हकीम, अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके, असिफोद्दीन खतीब आदींसह पक्षाचे राज्य व जिल्हा पातळीवरील नेते यांची प्रमुख उपस्थित होते. यावेळी बीड जिल्ह्यातून पक्षाचे विविध नेते, पदाधिकारी,तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.