जितेंद्र आव्हाड, वर्षभरापासून तुम्ही झोपला होतात का?, भाजपा आमदार भातखळकर यांचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण प्रकल्पातील 10 वर्षाच्या आत झालेले व्यवहार अवैध ठरवून त्यातील सदनिकाधारकांना घराच्या बाहेर काढण्याच्या नोटीसा द्यायच्या आणि दुसरीकडे 10 वर्षाची अट 5 वर्ष करू असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे म्हणणे म्हणजे मुंबईकर जनतेची निव्वळ फसवणूक आहे. गेल्या वर्षभरापासून न्यायालयात सरकारची भूमिका मांडून किंवा कायद्यात सुधारणा का केली नाही. वर्षभरापासून आपण झोपा काढत होता काय ? असा खडा सवाल मुंबई भाजपा प्रभारी व आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

आमदार भातखळकर म्हणाले की, तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने 10 वर्षाच्या आत खरेदी-विक्री केलेल्या लोकांना संरक्षण देण्याचा कायदा केला होता. या कायद्याविरोधात न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवेळी ठाकरे सरकारला यासंदर्भातली बाजू मांडण्याची गरज होती. हजारो सदनिकाधारकांना घराबाहेर काढण्याची तीव्र इच्छा असलेल्या ठाकरे सरकारने या संदर्भातील बाजू न्यायालयासमोर मांडून दिलासा देण्याचे धारिष्ट्य सुद्धा दाखविले नाही. या संदर्भात मी स्वतः सभागृहात व सभागृहाच्या बाहेर वारंवार आवाज उठवून सुद्धा सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. उलट आता या सर्व सदनिकाधारकांना तात्काळ घरे रिकामी करण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. घरे रिकामे न केल्यास पोलीस बळाचा वापर करण्याची धमकी सुद्धा सरकारने दिली आहे. सरकारने ही कारवाई तात्काळ थांबवून कायद्यात सुधारणा करावी. सदनिका धारकांच्या पाठीमागे भाजप भक्कमपणे उभे असून, ठाकरे सरकारने कितीही प्रयत्न केले तरीही कोणत्याही सदनिकाधारकांना घराबाहेर काढू देणार नाही. हजारो सदनिकाधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्यावतीने जनआंदोलन उभारणार असल्याचे भातखळकर म्हणाले.