आमंत्रण न दिल्याने भाजप आमदाराने घातला गोंधळ; व्हिडीओ झाला व्हायरल

नवी दिल्ली: पोलिसनामा ऑनलाईन – कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं नाही तसेच भूमीपूजन फलकावर नाव लिहिलं नसल्याने संतप्त झालेल्या भाजप आमदाराने शहीद स्मारकाच्या भूमीपूजन सोहळयात गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील बदलापूर येथे हि घटना घडली असून रमेश चंद्र मिश्रा असं या आमदाराचं नाव आहे. दरम्यान, मिश्रा यांनी कार्यक्रमस्थळी येऊन प्रचंड गोंधळ घालत फलकावर नाव नसल्याचं पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे याबाबत आपण तक्रार करणार असल्याचं देखील मिश्रा यांनी म्हटलं आहे. आमदाराने घातलेल्या गोंधळाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरमधील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सहाय्याने शहीद स्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी (डीएम) दिनेश कुमार सिंह हे स्मारकाच्या प्रवेशद्वाराचं लोकार्पण करणार होते. होम-हवन तसेच पुजेची सर्व तयारी कार्यक्रमस्थळी करण्यात आली होती. याच दरम्यान आपल्याला या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेलं नाही तसेच फलकावर आपलं नाव नाही हे समजल्यानंतर रमेश चंद्र मिश्रा यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. स्थानिक आमदार असूनही आपल्याला कार्यक्रमाला का बोलावलं नाही? अशी त्यांनी विचारणा केली. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या मंडळींना आणि अधिकाऱ्यांना याबाबत त्यांनी जाब विचारला. मतदारसंघात एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधीचं नाव भूमीपूजन फलकावर असलं पाहिजे असं रमेश चंद्र मिश्रा यांनी म्हटलं आहे.

 

 

 

दरम्यान, मिश्रा यांनी घातलेल्या गोंधळाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत संतापाच्या भरात पुजेसाठी आसनव्यवस्था करण्यात आली होती ती आमदारांनी लाथेने उडवली आहेत. तसेच खूप आरडाओरडा करत त्या ठिकाणी गोंधळ घातला. या प्रकारामुळे भाजपा आमदारावर टीका केली जात आहे. तसेच भाजपातील काही लोकांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.