भाजप आमदाराकडून ममता बॅनर्जींना ‘राक्षसा’ची तर योगी आदित्यनाथांना ‘हनुमाना’ची उपमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कायम वादात असणारे भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी आणखी एकदा मुक्ताफळे उधळली आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की 2024 साली भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होईल. यावर बोलताना ते म्हणाले की मोदी हे रामाचा आवतार आहेत तर योगी आदित्यनाथ हनुमानाचा आवतार आहेत. त्यामुळे 2024 पर्यंत भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होईल.

तर आमदार सुरेंद्र सिंह यांनी ममता बॅनर्जी यांची तुलना थेट राक्षसाबरोबर केली आहे. ते म्हणाले की, पुर्वीच्या काळात राक्षस, राक्षसीणी होत्या परंतू आता ती परंपरा समाप्त झाली आहे. आता मनुष्य रुपात राक्षसी परंपरेचे लोक आहेत, ममता बॅनर्जी त्याचं परंपरेतील आहेत. ज्या प्रकारे लंकिनीने हनुमानाला रोखले होते त्याचप्रकारे ममता राम आणि हनुमानाला रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. आता लंकिनीचा देखील नाश होईल आणि आता भाजप देखील विभीषणच्या शोधात आहे.

आमदार सुरेंद्र यांनी याआधी देखील अशा प्रकारची विधाने केली आहे. लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान प्रियंका गांधींना त्यांनी शुर्पणखा म्हटले होते. महाभारताचे उदाहरण देत त्यांनी मोदींना अर्जुन असल्याचे म्हटले होते. याबरोबरच त्यांनी मुस्लिम समाजासंबंधित देखील भडकाऊ वक्तव्य केली होती. निवडणूकीत आचारसंहिता भंगाचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. ममतांची राक्षसाशी तुलना केल्याने सोशल मिडिया वर त्यांच्यावर टीका देखील होत आहे.