भाजपचे खासदार दिलीप गांधी यांची अस्वस्थता वाढली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर दक्षिणेचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हे विखे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने अस्वस्थ झाले आहेत. शनिवारी ते तणावात असल्याचे आढळून आले. विखेंचा भाजप प्रवेश झाल्यास गांधी यांचा पत्ता कट होणार असल्याने चिंतेत भर पडली आहे. अस्वस्थ खासदार गांधी हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी डॉ. सुजय विखे हे भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांना मुंबईतील निवासस्थानी भेटीसाठी गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाजन हे शनिवारी नगरला आले. त्यांनी नगर दक्षिणेतील पक्षाचे आमदार व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर सायंकाळी महाजन हे विळद घाट येथे गेले. तेथून महाजन हे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या समवेत एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईत गेले. या सर्व घडामोडींमुळे खा. दिलीप गांधी अस्वस्थ झाले आहेत. विखे यांचा पक्षात प्रवेश झाला, तर आपल्या उमेदवारीवर गंडांतर येणार याची जाणीव झाल्याने गांधी व त्यांचे कार्यकर्तेही अस्वस्थ झाले आहेत.

विखे यांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी महाजन हे तातडीने नगरला आल्याने गांधी समर्थक कार्यकर्त्यांनी महाजन यांच्यासमोर घोषणाबाजी केली. खासदार गांधी यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आले. यावेळी गांधी यांच्यावर चेहऱ्यावरील ताण ते प्रसारमाध्यमांसमोर लपवू शकले नाहीत. महाजन हे विखेंसमवेत एकाच हेलिकॉप्टरमधून गेल्याच्या बातमीनंतर गांधी समर्थकांची अस्वस्थता आणखी वाढली आहे.