महाराष्ट्रात भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष ; ‘ही’ २ नावं चर्चेत

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यात महाराष्ट्रातील देखील अनेक खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. यात भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा देखील केंद्रातील मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे.

त्यामुळे आता दानवे दिल्लीत जाणार असल्याने महाराष्ट्रात भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. या पदासाठी भाजपमधून काही नावांची चर्चा सुरु आहे. यात शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजपचे सरचिटणीस संजय कुटे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

महाराष्ट्र्रात महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळवून देण्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपद देऊन त्यांना केंद्रात घेतले जाऊ शकते. राज्यात विधानसभा निवडणूक जवळ आल्याने त्याच तोडीच्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष पदावर नेमण्याचा विचार भाजपाचे वरिष्ठ नेते करत आहेत. त्यामुळेच विनोद तावडे आणि संजय कुटे यांचे नाव यासाठी आघाडीवर आहे.

दरम्यान, आज नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा होत असून मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक तरुण चेहऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. सदानंद गौडा, अर्जुन राम मेघवाल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले , सुरेश अंगाडी, पीयूष गोयल, बाबूल सुप्रियो, जितेंद्र सिंह, किशन रेड्डी, सुरेश अंगदी, स्मृती इराणी, प्रहलाद जोशी, राजनाथ सिंह, निर्मला सीतारमण, रविशंकर प्रसाद, मुख्तार अब्बास नकवी यांचा मंत्रिमंडळात समावेश नक्की असल्याचे समजत आहे.