भाजप पदाधिकार्‍यांकडून सरकारी कर्मचाऱ्यांवर भ्याड हल्ला

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी जिल्हा भूमिअभिलेखच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना शिविगाळ करीत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करीत भ्याड हल्ला केला . असा आरोप सांगली जिल्हा भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेने केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज काळ्याफिती लावून एक दिवसाचे लेखणी बंद आंदोलन कर्मचाऱ्यांनी केले.

संघटनेकडून संबंधीतावर करवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना दिले आहे. श्रीकांत शिंदे बुधवारी अचानक नक्कल विभागात आले. त्यांनी त्यांचे वैयक्तीक कोणतेही काम नसताना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करीत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातील दूरध्वनी संच उचलून आपटला असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे.

यापूर्वीही त्यांनी कार्यालयात गोंधळ घालून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. अशा प्रवृत्तीमुळे शासकीय कर्मचार्‍यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. जनतेच्या शासकीय कामकाजाबाबत तक्रारी असल्यास सनदशीर मार्गाने कारवाईची मागणी करणे गरजेचे आहे. कायदा हातात घेणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे संबंधीतांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

माझ्यावर खोटा आरोप

भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी निर्डावलेले असून, सामान्य लोकांची कामे अनेक वर्षापासून प्रलंबीत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन तक्रार देखील केली आहे. लोकांनी मुख्यमंत्र्यांकडेही तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याची दखल त्यांच्याकडून घेतली जात नसल्याने केवळ विचारणा करण्यासाठी गेलो होतो. पैसे खाता येत नसल्याने माझ्यावर खोटा आरोप केला जात आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.