विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडे नाराज ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भाजपाने विधान परिषद निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली असून नव्या चेहर्‍यांना संधी दिली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही. भाजपाच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद असल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे. पण वाघांनो असे रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस साहेबांचे आशिर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ? या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपाच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद आहे. अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. भाजपाच्या केंद्रीय समितीने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके , डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या चार नावांची विधान परिषदेसाठी घोषणा केली.

या चौघांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केले.विधान परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे विधानसभेच्या वेळी उमेदवारी नाकारलेल्यांसह पराभूत झालेले इच्छूक होते. भाजपमधील पक्षांतर्गत शीतयुद्धात खडसे, मुंडे, तावडे यांना संधी मिळू नये, असाच प्रयत्न सुरू होता. एका नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी दिल्यास अन्य नेत्यांवर अन्याय केल्यासारखे झाले असते. यातूनच माजी मंत्र्यांचा नावांचा विचार झाला नाही, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.