प्रवीण दरेकरांचे संजय राऊतांवर टीकास्त्र, म्हणाले – ‘तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसंदर्भात तुमचा अभ्यास कमी पडला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तोक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रासह गोवा, गुजरात या राज्यांना मोठा फटका बसला आहे. वादळामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात मोठ नुकसान झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, काँग्रेस नेते नाना पटोले यांसह अनेक नेत्यांनी कोकणचा दौरा केला. मात्र चक्रीवादळाच्या नुकसानीसंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा अभ्यास कमी पडला, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. यावेळी दरेकर यांनी ट्विटरवरून एक व्हिडिओही शेअर करून राज्य सरकारचा अहवाल म्हणजे कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचा आरोपही केला आहे.

दरेकर म्हणाले की, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या अहवालात राज्य सरकारकडून कोकणवासीयांना काही देण्याची मानसिकता दिसून येत नाही. कोट्यवधींच नुकसान झालेल असताना कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसणारा अहवाल सादर केला आहे. संजय राऊतांनी 2 हजार कोटींची अपेक्षा केंद्राकडून केली आहे. म्हणजे प्रथमदर्शनी राऊतांना 2 हजार कोटींचं नुकसान झाले आहे असे वाटले असावे. म्हणजे एक तर संजय राऊतांचा अभ्यास कमी किंवा शासनाची मानसिकता कोकणवासीयांना देण्याची नाही, असे दरेकर म्हणाले. दरम्यान, सदर अहवालात मनुष्यहानीकरता 41 लाख, पशुधन नुकसान 6 लाख 29 हजार, घरगुती वस्तू, कपड्यांसाठी 11 लाख 29 हजार, पक्क्या-कच्च्या घरांच्या पडझडीसाठी 25 कोटी 24 लाख, जनावरांच्या गोठ्यांसाठी 34 लाख 84 हजार, मत्स्य व्यावसायिकांसाठी 44 कोटी, शेती व बहुवार्षिक पिकांसाठी 16, 48 लाख अशा प्रकारे एकूण 47 कोटी 15 लाखांची मागणी संपूर्ण कोकणसाठी म्हणजे मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही मागणी झाल्याचे दरेकर यांनी सांगितले.