विकासाला गती देणारा अर्थसंकल्प : अमित शाह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री पियुष गोयल यांनी नुकताच २०१९ चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. हा अर्थसंकल्प म्हणजे  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर सर्वसामान्यांना खुश करणारा अर्थसंकल्प आहे अशी चर्चा रंगली असताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मात्र हा अर्थसंकल्प विकासाला गती देणारा आहे. हा सर्वांगीण अर्थसंकल्प असून रोजगारनिर्मिती करणारा अर्थसंकल्प ठरणार आहे असे मत व्यक्त केले आहे. एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी आपले मत व्यक्त केले.

मध्यमवर्गीय, शेतकरी, श्रमिकांसाठी महत्वाचा अर्थसंकल्प
अर्थसंकल्पाबाबत बोलताना शहा म्हणाले, मोदी सरकारने मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. केंद्र सरकारच्या या अंतिम अर्थसंकल्पामुळे लघुद्योगाला उत्तेजन मिळणार आहे. कामधेनू योजनेमुळे गायींच्या सुरक्षेमध्ये वाढ होण्यास मदत होईल. तसेच मध्यमवर्गीय, शेतकरी, श्रमिकांसाठी हा अत्यंत महत्वाचा अर्थसंकल्प ठरेल, असेही शाह म्हणाले. मच्छिमारांसाठी मत्स्यपालन विभाग बनविण्यात आला आहे. मच्छिमार बांधवांच्या कल्याणासाठी आमच्या सरकारने हे काम केले असल्याचे शाह म्हणाले. प्रधानमंत्री श्रमदान मानधन योजना गरिबांसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचाही दावाही शाह यांनी यावेळी केला.

महात्मा गांधी, विनोबा भावेंनी गायीचे महत्त्व सांगितले होते. त्यानुसार आमचा पक्ष काम करत आहे. देशातील गोमाता सुरक्षित राहाव्यात यासाठी आमचा कामधेनू आयोग कार्यरत राहिल, असेही शाह म्हणाले.आतापर्यंतच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत मोदी सरकारने संरक्षण खात्यासाठी विशेष सहाय्य केले आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे, असेही शाह म्हणाले.