Radhakrishna Vikhe Patil : ‘केंद्रावर आरोप करा अन् आपलं पाप झाका, एवढचं काम ठाकरे सरकार करतयं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   गेल्या चार- पाच दिवसांपासून राज्यात कोरोना लसीच्या तुटवड्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु झाला आहे. ठाकरे सरकारमधील नेते आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सध्या एकच काम दिले आहे. ते म्हणजे केंद्रावर आरोप करा आणि आपल पाप झाका, अशी टीका विखे-पाटील यांनी केली आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ठाकरे सरकारचा समाचार घेतला. राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याची भावना आहे. फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचे समाधान करू शकणार नाही, असा चिमटाही विखे-पाटील यांनी काढला आहे. केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा रेमडेसिवीर, ऑक्सिजन उपलब्ध करा. प्रत्येक मंत्र्याला आपापल्या मतदारसंघात 200 बेडचे कोविड रुग्णालय उभारायला सांगा. इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्याला व्हॅक्सिन मिळाले. पण त्याचे नियोजन राज्य सरकारला करता आले नाही. तो नियोजनशून्य कारभार झाकण्यासाठी किंवा लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. हजारो रुग्ण रुग्णालयात येतात, मात्र त्यांना बेड मिळत नाही, अशा शब्दात पाटील यांनी टीका केली आहे. येथील पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात. त्यांच्या स्वत:च्या तालुक्यात ते एकही कोविड रुग्णालय सुरू करू शकले नाहीत, असा खोचक टोला हसन मुश्रीफ यांना लगावला. सगळी मदार खासगी रुग्णालयांच्या भरवश्यावर सोडली आहे. नगर जिल्ह्यात 4 मंत्री आहेत, हे सर्व मंत्री करतात काय असा संतप्त सवाल विखे-पाटील यांनी केला आहे.