भाजप-शिवसेना लवकरच अडकणार लग्नबेडीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नाची धामधूम मोठ्या उत्साहात पार पडली. आता राजकीय वर्तुळातील दोन मोठ्या घराण्यात लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक आणि महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री, भाजप नेते रणजीत पाटील हे लवकरच व्याही होणार आहेत.

प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव पूर्वेश सरनाईक आणि रणजीत पाटलांच्या कन्येचं लग्न ठरलं आहे. सरनाईक-पाटील कुटुंबांत कौटुंबिक पद्धतीनं सुपारीचा कार्यक्रम झाला. लग्न पक्ककरून आता साखरपुड्याची तारीख निश्चित करण्यात येईल. साखरपुडा फेब्रुवारी महिन्यात तर लग्न मे महिन्यात होणार आहे.

पूर्वेश सरनाईक हे ठाणे महापालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि युवासेनेचे सचिव आहेत. ते नेमके लोकसभा निवडणुकीदरम्यान
लग्नबेडीत अडकणार आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेमध्ये युती होईल की नाही माहित नाही. अद्यापही त्यांच्यातील युतीचा वाद मिटलेला नाही. भाजप शिवसेनेकडे युतीसाठी हात पुढे करत आहे, तर शिवसेना तो नाकारत आहे. दोन्ही पक्षांमधील युती होईल की नाही हे आता स्पष्ट होणार नाही. मात्र प्रताप सरनाईक आणि रणजीत पाटील यांनी कौटुंबिक युती मात्र जाहीर केली आहे.