भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडेंचा गोैप्यस्फोट, म्हणाले – ‘राष्ट्रवादीत प्रवेश करणार असतो तर अटक करायला सांगितली नसती’ (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या खांद्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काकडे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय काकडे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असतो तर मला अटक झाली नसती, असा गौप्यस्फोट केला.

संजय काकडे म्हणाले, मी 35 वर्षे जमिनीचे व्यवहार करतो. एकही प्रॉपर्टीची केस नाही. सहा वर्षात कोणावर अन्याय केला असेल तर सांगावे. मात्र, गजानन मारणे प्रकरणात वापरण्यात आलेली गाडी राष्ट्रवादी पक्षाशी निगडीत असून देखील मला अटक करुन चौकशी करण्यात आली. पालकमंत्र्यांशिवाय अटक होऊ शकत नाही. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असतो तर मला अटक झाली नसती असे म्हणत त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला.

कोरोना स्थितीवरून बोलताना संजय काकडे म्हणाले, मुख्यमंत्री मुंबईचा, उपमुख्यमंत्री पुण्याचा परंतु, याच ठिकाणी सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत. याचाच अर्थ परिस्थिती नियंत्रणात नाही. काही झाले की केंद्र सरकारवर ढकलून मोकळे व्हायचे एवढेच काम आघाडी सरकारकडून करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाबाबत देखील तेच झाले. नेमकं राज्यात काय चालले आहे हेच समजेना झालेय, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले. मात्र, राज्य सरकार पुढे काय करणार हे समजले पाहिजे. सरकारने याचे उत्तर दिले पाहिजे. पुणे आणि मुंबईतील लोकांचे लसीकरण झाले पाहिजे. जेणेकरून या ठिकाणाचे उद्योग सुरु होतील. राज्य सरकारने नियोजन केले पाहिजे. मात्र, या सरकारमध्ये ताळमळे राहिलेला नाही, अशी टीका संजय काकडे यांनी केली.

प्रत्येक गोष्टीत राज्य सरकार केंद्र सरकारवर जबाबदारी झटकून मोकळे होते. हे कसे चालेल. आपले राज्य मोठे असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणला पाहिजे. राजकारण करण्यासाठी आयुष्य पडले आहे, असेही काकडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पंढरपूर निकालावरुन राज्य सरकारला टोला लगावला, ते म्हणाले पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली तरी देखील त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला.