आत्तापासूनच भाजपला २०२४ चे वेध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०३ जागा मिळवत बहुमत मिळवले आहे. त्यापूर्वी २०१४ साली भाजपाला २८२ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आता २०२४ ला यंदापेक्षा जास्त जागा मिळवण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले असल्याची माहिती भाजपचे नेते सुनील देवधर यांनी दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत संगितले.

लोकसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर आता भाजप २०२४ च्या लोकसभेच्या तयारीला लागले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपचे टार्गेट ३३३ जागा मिळविण्याचे असणार आहे, असे देवधर यांनी सांगितले आहे. ‘हिंदी भाषिकांचा पक्ष अशी आजही भाजपची प्रतीमा आहे.

त्या प्रतीमेतून जर पक्ष बाहेर आला तरच आम्ही आमच्या ३३३ जागांच्या लक्ष्यापर्यंत पोहचू शकतो. दक्षिण व पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी आता मी तेथील मुख्य भाषा शिकू लागलो आहे. बंगाली भाषेत मी मास्टर झालोय तर आता तेलगू शिकत आहे. जर तुम्हाला लोकांचे मन जिंकायचे असेल तर तेथील भाषा तुम्हाला आलीच पाहिजे’, असे देवधर यांनी यावेळी सांगितले.